आता सर्वच बाजारातील कापसाची आवक वाढलेली आहे. आवक वाढल्याने कापसाच्या दरावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिलच्या मागील आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा होऊन कापसाला ८ हजार ८४५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटलला भाव मिळाला होता. परंतु, या आठवड्यात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. तीन दिवसात कापसाचे दर २६० रुपयांनी खाली आले. आजही कापसाचे भाव शंभर रुपयांनी घसरल्याने ८ हजार ५८० रूपयांवर प्रति क्विंटलप्रमाणे पोहोचले.